सोमवार, २४ जून, २०१९

संघर्षज्योती

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राजकारणातील दिलीप कुमार (सर्वोच्च मार्गदर्शक)आहेत असं नाशिकमध्ये पंकजाताई मुंडे म्हणाल्या होत्या.स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब व शरदचंद्रजी पवार साहेबांचा सत्ता संघर्ष महाराष्ट्रचं नव्हे तर भारतातही चर्चेचा विषय होता..आहे व राहणार! दोन राष्ट्रीय पक्षाची परस्परविरोध विचारसरणी, तत्व,आव्हानं अंगीकृत असणारे राजकारणाच्या धावपट्टीवर अनेक वर्षे धावले.विजय पराजय हि सार्वभौम लोकशाहीतली दोन चषकं दोघांच्याही वाट्याला आली.प्रजाकारणात संघर्ष करताना एक संघर्षज्योत विझली.. दुसरी संघर्षज्योत अजुनही तेवत आहे.परंतु या ज्योती केवळ भ्रामक संकल्पनांवर निरंतर राहत नाहीत तर लोकशाहीभिमुख दिलेल्या सांकल्पिक विचारांवर तेवत राहतात.

लोकनेतृत्वाच्या भाषणातुन,विचारातुन,आचारातून,संघटनात्मक बांधणीतुन, समाज योगदानातुन नेहमीच कार्यकर्त्यांना नवउर्जा मिळालेली आहे.परंतु हि उर्जा कार्यकर्त्यांना देण्याची भाषाशैलीच त्या नेतृत्वाचे कार्यकर्तुत्व व भविष्यातील चढ उतार ठरवते हे देखील विसरुन चालणार नाही.तसेच उर्जेचा प्रभाव हा व्यक्ती दर व्यक्ती बदलत जातो.मंत्री पंकजाताई मुंडे यांनी विविध व्यासपीठावरुन आपल्या कार्यकर्त्यांना केलेल्या उर्जारुपी आव्हानांचा परिणाम निवडणूकांत,सार्वजनिक चर्चासत्रांत तसेच सोशमीडियातही चर्चेचा विषय आहे.विरोधाच्या परिसीमा ओलांडून अभिव्यक्त झालेलं मत प्रभावी ठरतं का?मानसिक,वैचारिक दृष्ट्या कमकुवतपणा प्रगट करणारी दार्शनिक अभिव्यक्ती काय कामाची?सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दावणीचा मारका बैल न मालकाचा न सहकाऱ्याचा..!

शरदचंद्रजी पवार साहेबांबाबतीत लिखाणाची बोलण्याची मर्यादा सोडुन पोकळ दाखले देणाऱ्या नवकार्यकर्त्यांना हे देखील माहित असावे कि आताच्या सत्तेतील बांडगूळांमुळे स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांना पक्ष सोडण्याची वेळ आली होती.सत्तासंघर्षापायी पिढीचे होणारे नुकसान व त्याला मिळणारे दिशाहीन वळण केंव्हाही धोक्याचेच आहे.