गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

भगवानगडाला भक्तांची गरज आहे..वारसदारांची नाही! - भाग-2

भगवान सेनेच्या निर्मितीमुळे बिथरलेल्या काही लोकांनी राजकीय हेतुने जिल्ह्यात काही अनिष्ठ गोष्टी घडुन आणल्या परिणामी बहुजन समाज विशेषथा वंजारी समाज बिथरला त्याचा परिणाम भगवान सेनेच्या माध्यमातून वंजारी समाजात एक सामाजिक व राजकीय भान आले. संपूर्ण बीड जिल्ह्यात भगवान सेना नावाच्या संघटनेची आदरयुक्त भिती निर्माण झाली होती. याचा योग्य फायदा लोकनेते मुंडे साहेबांनी घेतला. शिवाजी वाघ या शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या हतेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात राजकीय व सामाजिक अस्थिरथा निर्माण झाली. परिणामी लोकनेते मुंडेसाहेबांनी ही संघटना पुर्ण ताब्यात घेतली व 1993 ला पहिल्यांदा त्यांनी भगवान गडावर सामाजिक दृष्टया पहिला कार्यक्रम घेतला. तेंव्हा पासून दरवर्षी विजय दशमीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री बबनराव ढाकणे, माजी मंत्री तुकाराम डिघोळे हे मान्यवर एकाच व्यासपीठावर येवु लागले.

1995 ला राज्यात सत्ता परिवर्तन झाले. गडाला राजकीय पाठबळ मिळाले. 1996 साली भगवान बाबांचे जन्मशताब्दी वर्षे होते. त्या निमित्ताने एक ऐतिहासिक अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला. ज्या सप्ताहाचे संपुर्ण नेतृत्व आजचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. वास्तवीक भिमसिंहबाबा यांनी या संपुर्ण कार्यक्रमाची सुत्रे शास्त्रीकडे दिली होती. या सप्ताहानंतर 1997 ला सावरगाव या बाबांच्या मुळ जन्मगावी पुन्हा एक सप्ताहा झाला. त्याचे नियोजक स्वत: मुंडे साहेबांनी शास्त्रीवर सोपवले होते. एकीकडे अध्यात्मिक बाबतीत गडाची किर्ती वाढत असतांना दुसरीकडे मात्र गडावरच्या राजकीय भुमीकेला महत्व येवु लागले होते. 1999 ला राज्यातली युतीची सत्ता गेली होती. परंतू लोकनेते मुंडे यांनी भगवान गडाच्या माध्यमातून संपुर्ण ऊस तोडणार्‍या समाजावर आपला प्रभाव निर्माण केला होता.

 2003 साली नोव्हेंबर महिण्यात अचानक भिमसिंह बाबांचे आजारात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातल्या समाजाच्या मनात असलेल्या नामदेव शास्त्रींना सर्वा समक्ष या गादीचा वारसदार म्हणून  तत्कालीन गडाच्या तत्कालीन कार्यकारी मंडळाने बसवल्याचे जाहीर केले या वेळी मुंडे साहेब गडाचे ट्रस्टी नव्हते. मात्र ते समाजाचे नेते झाले होते.त्यामुळे समाजाच्या वतीने मुंडे साहेबांनी शास्त्रींच्या नावाची घोषणा केली तेंव्हापासून आजपर्यंत या पदावर शास्त्रींच्या काळात जे दसरा मेळावे झाले. त्या दसरा मेळाव्या बद्दल एक वेगळे सामाजिक समिकरण आपल्याला पहावयास मिळू  शकते. राज्यातील सत्ता गेली होती. सत्तेत असतांना भगवान गड हे माझे श्रध्दास्थान आहे असे साहेबांनी जाहीर केले होते. त्यामुळे एक भक्त म्हणून भगवान गडाच्या विकासात त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. भगवान बाबांनी अत्यंत कष्टातून उभ्या केलेल्या या गडाचा, गादीचा अथवा महंताचा अनादर होईल असे कधीही विधान केले नाही किंवा त्यांच्या समर्थकांनाही कधीच त्यांच्या परस्पर गडाबद्दल अथवा महंताबद्दल वाईट बोलण्याची हिम्मत केली नाही. त्यामुळे भगवानगड व गोपीनाथ मुंडे हे एक समिकरण बनले होते.

प्रत्येक वर्षी दसर्‍याच्या पंधरा दिवसा अगोदर गडावर कोणत्या पक्षाचा अथवा कोणत्या गटाचा, कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नेता आणायचा याचा संपूर्ण निर्णय स्वत: मुंडे साहेब घेत होते.काही दिवसांनी गडाची कार्यकारणी मंडळ मिटींग झाल्यास या गडाच्या ट्रस्टला अध्यक्ष म्हणून गोपीनाथ मुंडे हे न्याय देवु शकतील असा विश्वास डॉ.नामदेव शास्त्री यांना वाटला  व त्यामुळे त्यांनी स्वत: लोकनेते मुंडे साहेबांना अध्यक्ष होण्यासाठी सुचना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भगवान गड हे मुंडे यांच्या बरोबरच राज्यात्ल्या अनेक लोकांचे श्रद्धेचे ठिकाण बनले. त्यांच्या अनेक भुमीका गडावरुन राज्यातल्या लोकांनी पाहिल्या . त्यांना कधी मुंबई दिसली कधी दिल्ली दिसली व शेवटच्या सभेत त्यांना स्वत:ची कन्याही दिसली व त्यांच्या प्रत्येक भुमीकेत गडाने कायम सकारात्मक विचार करीत त्यांना आशिर्वाद दिला. मुंडे साहेबांना गड एकतर्फी मदत करतो यामुळे इतर पक्षातल्या नेत्यांनी व त्या नेत्याबरोबर काम करणार्‍या समाजतल्या अनेक लोकांनी दसर्‍या दिवशी गडावर येणे बंद केले. गडाची प्रतिमा हळु हळु वंजारी समाजाचा गड अशीच बनली. या गोेष्टीचा प्रचंड त्रास महंतांना सहन करावा लागला. तरीही आपण योग्य मानसाच्या पाठीशी उभे आहोत या भुमीकेतून डॉ.नामदेव शास्त्री यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या भुमिकेचे समर्थन केले. परिणामी त्यांना त्याचा त्रासही सहन करावा लागला. गोपीनाथ मुंडे यांची उंची लक्षात घेतांना त्यांची व गडाची भक्ती लक्षात घेतांना त्यांचे भाषण राजकीय होते की, सामाजिक होते. यापेक्षा राज्यातल्या सर्व भागात आदरयुक्त भीतीचे होते हा मॅसेज गेल्यामुळे  त्यांना सर्वांनी स्विकारले त्यांच्या आकाली जाण्याने मात्र आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

2014 च्या दसरा मेळाव्यात गडाने राजकीय फायदयासाठी गड वापरला म्हणून गडाच्या ट्रस्टीसह महंतावर गुन्हा दाखल झाला. तब्बल तीन महिणे महंत फरार होते. या काळात त्यांची साधी चौकशी करण्याची सुद्धा कुणाला गरज वाटली नाही. त्यानंतर गडाच्या विकासात आपले फार मोठे योगदान आहे. या अविरभावात काही लोकांनी गड म्हणजे आपली खाजगी मालमत्ता आहे ही भुमीका घेण्यास सुरुवात केली. परिणामी अत्यंत थंड डोक्याने भगवान गडाच्या कार्यकारी मंडळाने भगवान गडावर राजकीय भाषण बंदीचा निर्णय घेतला.  हा निर्णय घेतांना महंताने वारसदारा बरोबर अनेक वेळा चर्चा केली. डिसेंबर 2015 साली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव खडसे, रावसाहेब दानवे यांच्या समक्ष भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथगडाला शुभेच्छा देवुन या नंतर राजकीय भुमीका या गडावरुन तर धार्मीक भुमीका भगवानगडावरुन ठरेल व त्यामुळे राजकीय कोंडीत सापडलेला भगवान गड मोकळा श्वास घेईल असे जाहीर केले होते. तेंव्हा हजारो बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवुन याचे स्वागत केले होते. मात्र प्रत्यक्ष दसरा जसा-जसा जवळ येवु लागला तस-तसा सोशल मिडीयावर काही लोकांनी वाद घालण्यास सुरुवा केली. दोन्ही नेतृत्वाने ठरवुन घेतलेला निर्णय असतांना हा वाद निर्माण का केला गेला हे लोकांना कळु शकले नाही. परिणामी गेल्या वर्षी दसर्‍याच्या अगोदर सहा महिण्यापुर्वी कोठारबन तालुका वडवणी या गावात झालेल्या वार्षीक नारळी सप्ताहात संपुर्ण राजकीय  भाषण बंदी हा ठराव घेण्यात आला व तो आमलातही आणला गेला. या गोष्टीचा काही अंध भक्तांना प्रचंड राग आला व तब्बल पाच महिणे महंतांना खालच्या स्तरावर जावुन शिव्या देण्यात आल्या. वास्तविक वारसदाराने एक पोष्ट करुन हा चालेला सामाजिक गोंधळ थांबवु शकल्या असत्या मात्र आपले कडवे समर्थक कोणत्या टोकाला जावु शकता हे लोकांना दिसावे यासाठी प्रोत्साहन दिले. ठरावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या व सामाजिक अस्थर्य निर्माण केले. परिणामी गडावर होणारा दसरा पायथ्यावर आला कार्यक्रमात बाहेरच्या लोकांना बोलवुन महंताला व या वादाशी संबंध नसलेल्या नेत्यांना शिव्या देण्यात आल्या एक वर्षात बरेच पाणी वाहुन गेले.

आता पुन्हा एकदा दोन दिवसावर दसरा आला आहे. गेल्या एक महिण्यापासून पुन्हा तोच विषय चर्चेत आणुन युवकांचे डोके भडकावले जावु लागले आहे. गेल्या वर्षी निघालेले मराठा मोर्चे, टप्प्यात आलेल्या नगर पालीका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, ओबीसी समाजात असुरक्षीतेची भावना या सर्व गोष्टीचा एकत्रीत मिलाप झाला व गडाच्या पायथ्याला लोक जमवण्यासाठी दसरा मेळाव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाड्याच्या गाड्या लावुन मानसे जमवण्यात आले आपल्या पाठीमागे फार मोठा जमाव आहे असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. त्याच वातावरणातून आजुन बाहेर निघाले नाही परिणामी यावर्षी पुन्हा असे काही करता येते का याचा प्रयत्न सुरु झाला. फार प्रयत्न करुनही वातावरण तापत नाही असे लक्षात आल्यानंतर युद्धात जिंकण्यासाठी वापरावयाचे शेवटचे हत्यार म्हणजे भावनीक वातावरण व आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातुनच अहंकारी भाषेतले पत्र महंतांना प्राप्त झाले आहे. ज्या पत्रातली भाषा मुलीने बापाला लिहीली असु शकत नाही तर सासरच्या त्रासाला वैतागलेली एकादी विवाहीता आत्महत्या करतांना या पद्धतीने पत्र लिहीते अशी ही भाषा आहे. त्या पत्रात ना भावनिक ओलाव आहे ना आत्मीक प्रेम समाजाच्या नावावर गेल्या तीन वर्षात कोणत्याच स्टेशनवर आथवा टॅक्सी स्टॅन्डवर न दिसलेला समाज या पत्रामुळे आम्हाला दिसला. ज्या गडावर भगवान बाबा आहे तीच समाजाची ऊर्जा आहे. त्यासाठी कुणाचे भाषण ऐकुन आमच्यात उर्जा येते या गोष्टीवरचा आमचा विश्वास मुंडे साहेबा बरोबर संपला आहे . त्यामुळे भगवान गडाला ना कुणाच्या भावनिक भाषणाची ना समाजाला कुणाच्या भाषणातल्या उर्जेची गरज आहे असे वाटत नाही. तरीही काही लोकांना वाटत असेल आपण भाषण करावेच तर त्यांच्यासाठी पायथा उपलब्ध आहे. तुम्ही तिथे या पण भगवान गडाचे भक्त म्हणून वारसदार म्हणून नाही. एवढीच अपेक्षा पत्र लिहीणाराकडून व्यक्त करतो.
जय भगवान...जय गोपीनाथ

- संग्रहित लेख


भगवानगडाला भक्तांची गरज आहे..वारसदारांची नाही! - भाग-1


बीड जिल्ह्यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडाला गेल्या दोन वर्षात आनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. भगवान गड ही पवित्र भुमी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. साधारण 1940 च्या सुमारास नारायण गडाचा वाद सुरु झाले अनेक घडामोडी सुरु झाल्या त्यातुनच बाबांनी नारायण गडाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अंगावर असलेल्या कपड्या व्यतीरिक्त कोणतीही वस्तु किंवा संपती न घेता त्यांनी नारायण गडाचा जेंव्हा त्याग केला. तेंव्हा पुढे काय याचे कसलेही नियोजन नसतांना चालायला सुरुवात केली. खरवंडी ता.पाथर्डी येथील बाजीराव पाटील हे अत्यंत धार्मीक कुटूंब बाबांचे स्नेह होते त्यांना ही गोष्ट कळल्यावर बाबांची त्यांनी भेट घेतली. व त्यांना तेथेच थांबण्याची विनंती केली. काही दिवस थांबल्यानंतर खरवंडी जवळच एका उंच डोंगरावर बाबांनी थांबण्याचा निर्णय घेतला. ज्या डोंगराला धुम्या डोंगर नावाने ओळखले जाते. या ठिकाणी सुरुवातीला एक छोटेशे मंदीर होते. हळु हळु परिसर स्वच्छ होवु लागला. बाबा आता इथे थांबु शकतात. ही भक्तांना खात्री पटल्यास त्यांनी पुर्णपणे तेथे एक अध्यात्मीक केंद्र निर्माण करण्याचा संकल्प केला. व बाबांशी बोलल्यानंतर त्यांनी त्यास संमती दिली. आणि एका अभुतपुर्व अशा ऐतिहासिक भगवान गडाची कोणशिला निर्माण झाली. 1951 साली दसर्‍याच्या दिवशी शस्त्र पुजणांचा पहिला कार्यक्रम या डोंगरावर पार पडला. तेंव्हापासून आजपर्यंत दरवर्षी विजय दशमीला शस्त्र पुजन व सिमोलंगन करण्याची परंपरा सुरु झाली. ही परंपरा केवळ भक्तांच्या श्रद्धेतून सुरु झाली आहे. राजकीय वारसदारांच्या नाही हा विचार या निमित्ताने करण्याची वेळ आली आहे.

भगवान गड ही कोण एका जातीची, एका नेत्याची, एका पक्षाची अथवा कोणत्याही वारसदाराची खाजगी मालमत्ता नाही. तर आठरा पगड जातीच्या लोकांनी स्व: कष्टातून निर्माण केलेला तो सामाजिक व आध्यात्मिक भक्ती पिठाचा ठेवा आहे. सतत साथ वर्ष अथक परिश्रम करुन या डोंगरावर एक सुंदर दगडी बांधकाम करण्यात आलं त्याला मंदीराचा आकार देण्यात आला.  मंदीर पुर्ण झाले.या मंदीरात मुर्ती आल्याशिवाय देवपण येणार नाही आणि म्हणून तत्कालीन विधान सभेचे अध्यक्ष व बाबांचे परम भक्त जेष्ठ गांधीवाधी नेते बाळासाहेब भार्दे, यांनी विठ्ठलाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाबाकडे परवानगी मागितली. यासाठी कोण येणार याची चर्चा झाल्यावर तत्कालीन  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राष्ट्रीय राजकारणातील सहयाद्री यशवंतराव चव्हाण यांना बोलवण्याचा व त्यांच्या हस्ते ही मुर्ती स्थापन करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. 1958 ला लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी गडावर फक्त मुर्ती स्थापन केली नाही तर त्यांनी जाहीर केले. की आज पर्यंत धुम्या डोंगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जागेला पुढे अनेक वर्ष , अनेक पिडया भगवानगड म्हणून ओळखतील तेंव्हा पासून हा परिसर तिर्थक्षेत्र भगवान गड म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यास यशस्वी झाला.

1965 ला पर्यंत दरवर्षी भगवान बाबांनी दसर्‍याच्या दिवशी शस्त्र पुजन व गावाच्या पायथ्या जवळील 25 गावातील लोकांना एकत्रीत करुन एक उत्सव सुरु केला. त्या उत्सवाचे रुपांतर म्हणजे आजचा दसरा मेळावा. बाबांच्या निधनानंतर त्यांच्या गाधीवर आलेल्या हरीभक्त परायण भिमसिंह बाबांनी ही परंपरा सतत 38 वर्ष अखंडपणे चालवली. परंतू भगवान बाबांच्या मुळ परंपरेत टप्या टप्याने बदल करत गेला. 1978 नंतर या भागात उस तोड कामगारांचे संघटन करणार्‍या व ती संघटना चालवणार्‍या माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी गडाच्या या उत्सवात लक्ष घातले. ऊसतोडायला जाण्यासाठी मजुरांची भरर्ती ही ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिण्यात असते. व याच दरम्यान हा मेळावा असल्याने कारखाल्याला जाण्यापुर्वी एक सामाजिक ऊत्सव करुन लोक कामासाठी जाण्याची परंपरा सुरु झाली.  ही परंपरा पुढे चालु असतांना राज्याच्या राजकारणात व ऊसतोड कामगारात मोठ्या प्रमाणात सामाजिक व राजकीय बदल झाले परिणामी वेगवेगळे नेते व कार्यकर्ते जन्माला आले. 1992 ला लोकनेते गोपीनाथ राव मुंडे हे राज्याच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते म्हणून चर्चेत आले. त्यांनी स्वत:च्या वकृत्वाने व नेतृत्वाने सामाजिक प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली.वर्षानु वर्षे नेतृत्वासाठी चाचपणत असलेल्या ऊसतोडणार्‍या कामगारा त्यांचा रुपाने एक नेतृत्व भेटले. याचा परिणाम आपल्या आयुष्यात काही तरी बदल घडेल या भावनेतून ऊस तोडणार्‍या सर्व लोकांच्या दृष्टीने मुंडे साहेब हे नेते बनले. मात्र राजकीय दृष्टया लोकनेते मुंडे साहेबांना हा पुर्ण समाज एकत्रीत आण्यात यश येत नव्हते. अशा वेळी 1993 ला बीड शहरात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनामुळे भगवान सेना या सामाजिक संघटनेची निर्मिती झाली.

क्रमशः....

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

सत्य असत्याशी मन केले ग्वाही.. मानियले नाही बहुमता


वारंवार धनंजय मुंडे साहेबांवर खलनायकीचे होणारे आरोप व त्यावरील निर्बुद्धीने केलेल्या प्रतिक्रिया या मला तर हास्यास्पद वाटतात.चला जरा जाणुन घेवु त्याबद्दल..

1-जे घरचे नाही झाले ते इतरांचे काय होणार? मला वाटत ह्या आरोपाचं खंडण तर साहेबांनी एक कर्तव्यनिष्ठ विरोधी पक्षनेता म्हणून केंव्हाच केलय. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सरकारदरबारी अभ्यासुपणे बाजु मांडून त्यांच निरसन होण्यासाठी सर्वतोपर प्रयत्न केलेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलेत.त्यामुळे इतरांचे काय होणार? या टीकेला पुर्णविराम इथेच मिळेल.

2-उभ्या हयातीत गोपीनाथ मुंडे ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्या पुतण्याने त्या पवार कुटुंबाशीच हातमिळवणी केली. या टीकेलातर मुख्य प्रचारपद्धती वापरुन काही जणांनी आपल्या राजकीय झोळ्या भरल्या. असो या टीकेची गोष्ट अशीच झाली कि द्रोणाने एकलव्याला गुरुदक्षिणेत अंगठा मागणे.आज आपण सांविधानिक युगात वावरतोय.भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेली स्वातंत्र्ये हि धनंजय मुंडे साहेबांला देखील तितकीच लागु होतात जितकी त्यांवर आरोपांचे ताशेरे ओढणार्यांना होतात. साहेबांनी कुठल्या पक्षात राहुन त्यांच्या सामाजिक कार्याला वळण द्यावे हा त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ठरतो. त्यात इतरांनी अनैतिक दखल देणे हे कितपत योग्य आहे.

कौटुंबिक सुखदुखाचे त्यांचे अधिकारांत इतरांनी राजकीय हव्यासापोटी व्यर्थ ढवळाढवळ करणे हि खेदात्मक गोष्टच मानावी लागेल. आज एक सांविधानिक पदावर कार्य करत असताना त्यांच्या कार्याची दखल संपुर्ण राज्याने घेतलीय. त्यामुळे निराकरण स्वतच प्रश्न न बनता त्यांच्या कार्यकर्तुत्वाला मान्य करणे हेच खरं जबाबी दायित्व होईल.सामाजिक मानसिकतेच्या बहुमताचंं पारडं त्यांच्याबाजुन आज कललेलं आहे केवळ राजकीय मतरुपी पारड्याची त्यात भरीची आवश्यकता आहे तेहि येणार्या काळात पहायला मिळेल.

- रा.उ.कदम (बीड)