मंगळवार, १८ जुलै, २०१७

"जैसे सुख दुःख आपुले देही,तैसेचि सर्वांभूती पाही!" धनं-विजय



आजच्या महाराष्ट्राला धनंजय मुंडे हे नाव श्रुत आहे, पण काका पुतणे असे राजकीय समीकरण असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी धनंजय म्हणजे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या एवढीच ओळख होती, पण खरंच असं होतं का ? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी परळी म्हणजे पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघाचा इतिहास उखडून बघावा लागेल.1991-92 ला पहिल्यांदा स्व.मुंडे साहेब राज्याचे विरोधी पक्षनेते झाल्यापासून म्हणजे धनंजय यांच्या अगदी नवतारुण्यापासून थेट जनतेशी जोडले गेले. स्व.मुंडे साहेब राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि स्थानिक जबाबदाऱ्या पर्यायाने स्व. पंडित अण्णा व नवतरुण धनंजय यांच्यावर आल्या. त्यानंतर स्व. मुंडे साहेबाना स्वतःच्या मतदार संघात मागे वळून पहायची वेळ क्वचितच आली असेल! हळू हळू वडील व चुलते या दोन मातब्बर राजकारण्यांच्या शाळेतला धनंजय हा विद्यार्थी राजकारणाचे धडे गिरवत गेला!

सार्वजनिक काम असो,सामाजिक अडी-अडचणी असोत,किंवा कोणाचे वैयक्तिक काही काम असो, धनंजय कडे गेलेला माणूस कधीच निराश ओरतला नाही, हे आजही अभिमानाने सांगता येईल.

जसजसे हे युवा नेतृत्व बहरत गेले तसतसे धनंजय यांचा चाहता वर्ग वाढत गेला, सोबतच काही स्वार्थी व विघनसंतोषी लोकांच्या डोळ्यात खुपत गेला. पुढे बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्तेसाठी झालेल्या घडामोडी असतील किंवा विधानसभा-लोकसभा निवडणुकीतले जय-पराजय असतील, धनंजय यांनी सगळ्या परिस्थितीला मात देताना जी राजकीय पतीपक्वता दाखवली त्यातूनच भाजपा नेतृत्वाने युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे धनंजय यांच्या ताब्यात दिली! नरेंद्र मोदी यांची त्या कालची पुणे येथील महासभा ही या निवडीला सार्थ ठरवून ह्या युवा नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. तिथूनच खऱ्या धनंजय पर्वाची नांदी झाली म्हणावे लागेल! पण नियतीला व त्यांच्या राजकीय शत्रूंना कदाचित हे मान्य नसावं, म्हणूनच 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी माघार घ्यावी लागली, पण तरीही धनंजय यांनी पक्षधर्म व कुटुंबधर्म सांभाळत मोठ्या मनाने लहान बहिणीचा प्रचार केला, निवडूनसुद्धा आणल!

पुढे मुंडे कुटुंबात झालेले सर्व विषय संबंध महाराष्ट्राने पाहिले. शेवटी स्वतःचे अस्तित्व आणि कर्तृत्व सिद्ध करायला एकटाच घराबाहेर पडलेला हाच धनंजय आज नामदार धनंजय मुंडे झालेला संबंध महाराष्ट्राने पाहिला!

काकांशी गद्दारी केली,बहिणीचा विरोध करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याना मुद्दाम मोठं पद दिलं, असे अनेक आरोप धनंजयवर झाले, काही लोक सोशल मीडियावर आजही त्या चर्चा रंगवतात. परंतु अविरत संघर्ष,जनतेशी थेट जोडलेले ऋणानुबंध,असा हजारो किलोमीटर चा प्रवास करत असताना धनंजय यांनी आपले संघटन कौशल्य, मतदारसंघावर तयार केलेली मजबूत पकड आणि आपली जबरदस्त भाषण शैली यांच्या जोरावर ह्या सर्व चर्चा फोल ठरवल्या! आपल्या अभ्यासू, निर्भीड भाषणातून त्यांनी विरोधी पक्षनेता कसा असावा याचे एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले.

काही जातीयवादी संघटना संकुचित विचार मनात ठेवून सोशल मीडिया सारख्या माध्यमांमध्ये धनंजय यांच्यावर सातत्याने व हेतुपुरस्सर टीका करून समाजासमोर खलनायक अशी प्रतिमा तयार करायचा केविलवाणा प्रयत्न करतात, काहींनी तर राजकीय व कौटुंबिक मिश्रण तयार करून भावणीकतेचा आधार घेत धनंजय यांना परळीच्या कुरुक्षेत्रांतले कौरव ठरवायचा प्रयत्न देखील केला. पण एकंदरीत पूर्ण माहिती घेऊन सत्य स्वीकारून उदाहरणे व्यवस्थित तपासून पाहिली तरच खरं सत्य लक्षात येईल. धनंजय हे आज राजकीय धुरंदर समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, एवढेच नव्हे तर सत्ताधारी पक्षात सुद्धा त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मान सन्मान आहे, याची प्रचिती मंत्रायलायत गेल्यावर येते! टीकाकारांनी याची सत्यता मात्र अवश्य पडताळून पहावी. राजकीय मतभेद कौटुंबिक कलह आणि वैयक्तिक द्वेष यातला फरक समजायला समाजसपणाच नव्हे तर तेवढी परिपक्वता पण लागते ! विविध दुःखद प्रसंगामुळे सलग तीन वर्षे वाढदिवस साजरा न करणे, वाढदीवसाला हार तुरे न स्वीकारणे यातून धनंजय यांची नैतिकताच नव्हे तर मनाचा मोठेपणा पण दिसून येतो.

म्हणूनच सरते शेवटी एवढंच सांगावस वाटतं की धनंजय मुंडे हे राज्य व बीड जिल्ह्यातील राजकारणातले भीष्म जरी ठरले असले तरी कौटुंबीक व परळीच्या कुरुक्षेत्रात मात्र धर्मवीर युधिष्ठिराच्या भूमिकेत आहेत व शेवटपर्यंत राहतील! तसे लिहायला अजून बरेच काही आहे पण आज वाढदिवसानिमित्त परळीच्या या धर्मवीर युधिष्ठिरास अभिष्टचिंतन व शतशः नमन!

- सुधीर सांगळे ( संग्रहित लेख )
                                                                                                                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा