अविचल मूल्यनिष्ठा व व्यावहारिक लवचिकता, वैचारिक दुरावा व व्यक्तिगत ममत्व, सत्तायोग व सेवाधर्म यासोबतच प्रादेशिकता व राष्ट्रीयत्व या वैशिष्ट्यांवर हक्क सांगणारा शरद पवाराजींएवढा उंचीचा व मान्यतेचा दुसरा नेता आज महाराष्ट्रात नाही. लोकप्रियता आणि लोकक्षोभ यातून सुखावून आणि सलाखून निघालेला तसा सर्वमान्य पुढारीही महाराष्ट्रात कोणी नाही.
शेतकरी कामगार पक्षाच्या डाव्या वैचारिक परंपरेचा कुटुंबातून मिळालेला वारसा, यशवंतराव चव्हाणांसारख्या प्रगल्भ मार्गदर्शकाचा राजकीय संस्कार, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा मनोमन केलेला अंगीकार आणि राजकारणातील केवढ्याही मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्याची आणि त्यातली कोणतीही जबाबदारी समर्थपणे पेलून धरण्याची क्षमता जपणाºया शरद पवारांना स्वपक्षाएवढीच विपक्षातही मान्यता आहे.५० वर्षांच्या राजकीय व वैधानिक आयुष्यात त्यांच्या वाट्याला अनेक मोठी व महत्त्वाची पदे आली. देवदुर्लभ सन्मान आले, कोणत्याही मान्यताप्राप्त पुढाºयाच्या वाट्याला येऊ नये अशी टीकाही आली. पण प्रशंसेच्या हारांनी ते कधी भारावले नाहीत आणि टीकेच्या प्रहारांनीही ते कधी डगमगले नाहीत. आयुष्य आणि अनुभव, काळ आणि त्यासोबत बदलत जाणारे समाजाचे प्रश्न या साºयांकडे कमालीच्या विधायक दृष्टीने पाहत त्यांनी राज्याचे व समाजाचे नेतृत्व केले.
युवक काँग्रेसचे जिल्हा पातळीवर नेतृत्व करीत असतानाच आपल्या क्षेत्रातील सव्वाशेहून अधिक खेड्यांना सिंचनक्षमता प्राप्त करून देणारा हा तरुण नेता साºया महाराष्ट्राची तशीच सेवा करताना आयुष्यभर आढळला.
चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर १९९४ साली मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे केले. त्यासाठी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना व त्यांच्या पक्षाला त्याची किंमतही मोजावी लागली. पण, सामाजिकदृष्ट्या पवार साहेबांनी आपल्या धोरणाशी प्रामाणिक राहून नामांतराचा विषय मार्गी लावला. सभोवती मृत्यूचे थैमान असताना शेकडो प्रेतांच्या मध्यभागी सारे प्रदूषण अनुभवतच त्यांनी लातूरच्या भूकंपग्रस्तांना दिलासा दिला. आपल्या मनाचा थांग लागू न देता समोरच्याला आपलेसे करून घेण्याची त्यांची वृत्ती अनुकरणीय आहे. सोबतच्या विश्वासू माणसांना जपत असतानाच आपल्या विश्वासाला धक्का लावणाºया माणसांना खड्यासारखे दूर करण्याची त्यांची तटस्थताही विलक्षण आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या चार कारकिर्दी यशस्वी करणाºया पवारांनी केंद्रातील संरक्षण व कृषी ही दोन्ही महत्त्वाची व संवेदनशील खाती राबविली. लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेतेपदही त्यांनी समर्थपणे अनुभवले. काँग्रेस या मातृपक्षापासून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला व तो एकहाती वाढवून राज्यव्यापी केला. ते करताना आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळ व साधने पुरविली आणि प्रसंगी ते त्यांच्या मागे सर्वशक्तिनिशी उभे राहिले. हे राजकारण करीत असतानाच महाराष्ट्राच्या विकासावरील त्यांचे लक्ष कधी विचलित झाले नाही. येथील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, ग्रामीण भागातील लघुउद्योग आणि सुखसोई याबाबतचा त्यांचा आग्रह पूर्वीएवढाच आजही कायम आहे. शेतकºयांच्या उत्पादनाला न्याय्य भाव मिळावा आणि ग्रामीण भागातील माणूस समाजाच्या इतर वर्गांसोबत बरोबरीच्या नात्याने उभा राहावा हे त्यांचे स्वप्नही त्यांनी कधी नजरेआड होऊ दिले नाही. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंतच्या प्रत्येकच क्षेत्राची गरज समजून घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे पवारांचे नेतृत्व महाराष्ट्रासाठी वरदान ठरले आहे. त्यांच्याशी अनेकांनी वैर केले, त्यांना जिव्हारी लागेल अशी टीकाही त्यांच्यावर केली, अविश्वसनीयतेपासून साºयांना संभ्रमात ठेवणारा नेता अशी टीकाही त्यांनी अनुभवली. मात्र विकासावर लक्ष केंद्रित केलेल्या या नेत्याचा संयम त्यातल्या कशानेही ढळलेला कुणाला दिसला नाही.
पवारांनी मराठवाड्यासाठी केलेले काम या प्रदेशाला समृद्धी व संपन्नतेएवढेच सामाजिक स्वास्थ्य देऊन गेले आहे. येथील अनेक वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये त्यांच्याच प्रयत्न व प्रेरणांनी येथे उभी राहिली. शिक्षण व संस्कृतीची आज जी विविध दालने येथे खुली झाली त्यांचेही श्रेय खºया अर्थाने पवारांकडेच जाणारे आहे. औरंगाबाद-वाळुज ही महत्त्वपूर्ण औद्योगिक वसाहत त्यांच्याच प्रयत्नांतून उभी राहिली. मला आठवतं, त्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री होते माझे वडील जवाहरलालजी दर्डा. पवारसाहेब साहेबांएवढा प्रचंड मेहनत घेणारा दुसरा कुणी राजकारणी महाराष्ट्रात आहे असं मला वाटत नाही.
क्रमश....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा