साहित्यिक, लेखक, विविध विषयांतील तज्ज्ञ यांच्यासोबत ते नेहमीच वावरताना दिसतात. मी राज्याचा शिक्षणमंत्री असताना मला त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत होते. शिक्षण क्षेत्रात काय नवीन केले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे, त्यासाठी ते आमच्यासोबत अनेक बैठकी घ्यायचे. गोविंदभाई श्रॉफांसारखे आंदोलक, अनंत भालेरावांसारखे कठोर पण चोखंदळ टीकाकार, बापू काळदात्यांसारखे समाजवादी नेते यांनाही ते सदैव आपले वाटले. हमीद दलवाईसारख्या क्रांतिकारी कार्यकर्त्याला त्याच्या अखेरच्या काळात आपल्या घरी आश्रय देऊनही महाराष्ट्रातील अल्पसंख्य समाजाशी पवारांना आत्मीयतेचे संबंध राखता आले.
नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांना एकाचवेळी मैत्र राखता येते, बाळासाहेब ठाकरे आणि फारुख अब्दुल्ला ही त्यांच्या परिवारातली माणसे असतात. इंदिराजी, राजीवजी, नरसिंहराव आणि डॉ.मनमोहनसिंग यांच्या सत्ताकाळात पवार त्यांचे सहकारी राहिले. मात्र त्यांना मिळालेला बहुमान त्यांच्या सत्तापदाचा नाही, त्यांना मिळालेल्या पद्मविभूषण या किताबाचाही नाही, तो त्यांना मिळालेल्या लोकमान्यतेचा आहे. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशी सगळी क्षेत्रे नुसती व्यापण्याचाच नव्हे तर प्रसंगी मार्गदर्शन करण्याचा अधिकारही त्यांना प्राप्त आहे.लो. टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, एसेम जोशी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पश्चात महाराष्ट्राला लाभलेला सर्वात मोठ्या उंचीचा व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा हा नेता त्यांच्या राजकीय आयुष्याचे अर्धशतक पूर्ण करतो तेव्हा तो केवळ महाराष्ट्राचा नेता, मुख्यमंत्री वा मार्गदर्शकच राहत नाही, तो त्याच्या अर्धशतकाच्या इतिहासाचा निर्माताही झालेला असतो.
- राजेंद्र दर्डा (लोकमत एडिटर इन चीफ)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा